गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडाकडे पाठ   

वृत्तवेध 

शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी)संदर्भात मोठा डेटा समोर आला आहे. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया’ (एएमएफआय) च्या ताज्या अहवालाने चिंता वाढवली आहे. ‘एएमएफआय’ च्या अहवालानुसार, मार्च २०२५ मध्ये ‘एसआयपी’द्वारे एकूण २५,९२६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. ती गेल्या चार महिन्यांमधील सर्वात कमी आहे. याच सुमारास ५१ लाख ‘एसआयपी’ खाती बंद करण्यात आली होती. ही घसरण अशा वेळी आली आहे जेव्हा बाजारात अस्थिरता आणि गुंतवणूकदारांची सावधगिरी वाढली आहे; मात्र चांगली गोष्ट म्हणजे हळूहळू रिकव्हरीची चिन्हेही बाजारात दिसू लागली आहेत.
 
फेब्रुवारीमध्ये २५,९९९ कोटी खाती होती. ‘एएमएफआय’च्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये ५१ लाख ‘एसआयपी’खाती बंद करण्यात आली तर ४० लाख नवीन खाती उघडण्यात आली. यामुळे ‘एसआयपी स्टॉपेज रेशो’मध्ये मोठी वाढ झाली आहे. जुनी ‘एसआयपी’ खाती एक तर कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बंद केल्या जात आहेत किंवा गुंतवणूकदार मध्येच बंद करत आहेत. नवीन गुंतवणूकदार त्यात संथ गतीने सामील होत आहेत.
 
‘एसआयपी’ खात्यांची संख्या फेब्रुवारीमध्ये ८.२६ कोटींवर तर मार्चअखेर ८.११ कोटींवर घसरली. सलग तिसर्‍या महिन्यात ही घसरण झाली आहे. मार्च २०२५ पर्यंत म्युच्युअल फंडांमध्ये एकूण १३.३५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता ‘एसआयपी’द्वारे व्यवस्थापित केली जात होती. विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये ‘एसआयपी’चा आकडा केवळ ८,५१३ कोटी होता. तो पाच वर्षांमध्ये वाढून २६,००० कोटी झाला. यावरून दिसून येते, की सध्याच्या अस्थिरतेमुळे वेग मंदावला असला तरी दीर्घकाळात ‘एसआयपी’वरील गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित आहे.

Related Articles